भोज्जा

गुरुवार, १ सप्टेंबर, २०११

रतन खत्री आणि "कुंकू"

आज बऱ्याच दिवसांनी झी मराठीच " कुंकू " बघायचा योग आला नि एकेकाळचा मटकाकिंग रतन  खत्रीची आठवण झाली.म्हणजे झालं असं कि,बावळट,दुबळ्या नि ह्या अनुषंगाने येणाऱ्या बऱ्याच विशेषणांनी युक्त म्हणजेच बिनडोक वगैरे वगैरे असलेल्या जानकी वरील सध्याच्या  नवीन अत्याचारांची मालिका बघून... हे अत्याचार आज थांबतील  ,उद्या थांबतील ह्या आशेने वर्षानुवर्षे हि मालिका बघणाऱ्या आमच्या तमाम भगिनी वर्गाची होणारी उलघाल,झालेली अगतिकता बघून खूप भरून आले.कारण संध्याकाळचे सात वाजल्यावर एकवेळ "ते" कुंकू गेलं तरी चालेल म्हणजे म्हणजे स्वतःचे सौभाग्य  पण "हे" कुंकू जाता कामा नये एवढी  ह्या  मालिकेची  महिलां  मध्ये  लोकप्रियता  आहे.थोडक्यात काय तर कामावरून घरी येणाऱ्या स्वतःच्या त्या "कुंकवा" पेक्षा,आमच्या भगिनी वर्गास  ह्या "कुंकवाची" नि जानकीची काळजी जास्त.


तर सांगायची गोष्ट म्हणजे काय तर सुमारे ३०-३५ वर्षांपूर्वी रतन खत्रीचा 'बॉम्बे बाजार"म्हणजेच "मुंबई बाजार" हा मटका फॉर्म मध्ये असताना आमच्या काही "मटकाप्रेमी" मंडळीं कडून त्या वेळी आम्हाला खात्रीलायकरीत्या असे समजले होते कि ५  ..म्हणजेच पंजा हे घर... म्हणजेच ५ हा  आकडा..हा काही महिने "फुटलाच" नाहीये.पूर्वी असा ह्या पद्धतीने एखादे "घर"बंद करण्याचा प्रकार तेव्हा मटका खेळणाऱ्या लोकांना अगदी नवीन जरी नसला तरी साधारण महिन्याभरात मागे पुढे ते "बंद घर" पुन्हा उघडले जायचे असा जुना अनुभव असायचा.पण ह्या वेळच्या "पंजाची" तऱ्हा काही औरच होती.बघता-बघता महिन्याचे दोन महिने झाले ...नंतर ३-४-५ महिने उलटून गेले...तरी ते घर बंद ते बंदच.५ हा आकडा खेळणारा दुसर-तिसर काही नाही तर रोज फक्त बुडीत खात्यात.दरम्यानच्या काळात त्या क्षेत्रातील काही तज्ञ मंडळींनी आता पंजाचे घर उघडायच्या अटकळीने पंजा फॉलो करायला सुरवात केली.म्हणजे काही नाही... रोज डोकं गहाण ठेवून फक्त ५  हाच  आकडा लावायचा. नि चौका किंवा छक्का जर आला तर "च्यायला,साला आज पण नुसत जवळन वारं वाहून गेल" असंच फक्त म्हणायचं. थोडक्यात काय तर पब्लिकला खत्रीच्या "पंजाची" पुर्री नाश चढली.बघता बघता ६ महिने उलटून गेले तरी पंजाचा पत्ताच नाही..शेवटी लोक पंजाला फॉलो करून-करून दमले,थकले,रुसले,चिडले ...कित्येक तर पार बरबाद झाले.थोडक्यात म्हणजे रतन खत्रीने १ ते १० ह्या अंकातील ५ हा आकडा मटका प्रेमींना पार विसरायला लावला.नि अचानक एक दिवस अनपेक्षितपणे पंजा मटका पटावर झळकला,नि सर्व मटका प्रेमींनी हुश्श केलं.अहो मटका अड्डेवाल्यांनी तर दिवाळीची आठवण करून देणारी आतषबाजी केली.पण हुशार अशा त्या खत्रीने,"तो पंजा" त्या  नंतर फक्त एक दोनदाच "टाकून" पुन्हा काही कालावधी साठी बंद करून टाकला.

सध्याच्या "कुंकू"ह्या मालिकेच्या निर्मात्या,लेखक,पटकथा,संवाद लेखक मंडळींना बहुदा रतन खत्रीचा 'तो"खेळ माहित असावा कारण मालिकेत दाखविल्या प्रमाणे प्रामाणिक,सत्शील नि सरळ मार्गी जानकीचे "न्यायाचे"घर सदरहू मंडळींनी अशा पद्धतीने  बंद करून ठेवले आहे कि बिच्चारे प्रेक्षक आपले रोज उठून  न चुकता सात वाजता दत्त म्हणून जानकी समोर बसतात,कि हिची न्यायाची बाजू निदान काही अंशी आज तरी समोर येईल,पण कसचे काय नि कसचे काय ? नुसत जवळून वारं वाहून जात नि दुसर काय?   बिचारे प्रेक्षक रोज साडेसात वाजता "त्या" जुगारात  हूस होऊन,नंतर आपापल्या कामाला लागतात.
 

कथे मधील नायकाचा अथवा नायिकेचा अंतिम विजय चित्तथरारक होण्या साठी कथेतील खलनायक अथवा खलनायिका सशक्त असावी लागते हे जरी मान्य केले तरी,भाबड्या प्रेक्षकां वर अशा मालिकांचा,त्याचा अतिरंजित कथानकाचा कितपत परिणाम होतो-न होतो, हे कळायला काही मार्ग नाही. ह्या मालिके मधील नायिकेचा वारंवार होणारा पराभव पाहून सत्याचा निदान शेवटी तरी विजय होणार आहे कि नाही का सत्याने, न्यायाने वागणे हे चूकच आहे हा भाबड्या प्रेक्षकांना प्रश्न पडावा इतपत त्याचा वारंवार अतिरेक होताना आढळते पण आता "ह्या" नंतर प्रेक्षकांना काय हवे असणार,वाटत असणार ह्याची मुरब्बी निर्मात्यांना पूर्ण अटकळ असल्याने,जो पर्यंत मालिकेच्या टी आर पी चा कडेलोट होत नाही तो पर्यंत "पंजा" खोलायाचा नाही  हा जुगारातील नियम येथे सुद्धा लागू होताना दिसतो.      
 

मुळात आपल्या कडे अजूनही मालिका प्रेक्षकां मध्ये वैचारिक प्रगल्भता तशी यथातथाच आहे,असे वाटावे असा संशय येतो..न पेक्षा निदान मालिका निर्मात्यांना तर बहुदा तशी खात्री असावी कारण वर्ष दीड वर्ष परशुचे अत्याचार सहन करून,जानकीच्या "सत्याचा" झालेला विजय निर्मात्यांनी अवघ्या दीड ते दोन भागात गुंडाळलाच नसता.थोडक्यात काय तर परशूच्या अत्याचारांचा आता जानकीला बदला घ्यायला मिळणार असे वाटत असतानांच रतन खत्रीने "पंजा" पुन्हा बंद करून अहिल्या नि नीताने जानकीला कोंडीत पकडण्याचा नवीन डाव सुरु ठेवलाय.
 

थोडक्यात काय तर दुनिया झुकती ही झुकानेवाला चाहिये.रतन खत्री का जवाब नही !                           

३ टिप्पण्या:

  1. psychology! works in that way
    as you said..."दुनिया झुकती ही झुकानेवाला चाहिये"
    बाकी रतन खत्री आणि कुंकू संबंध लय भारी!

    उत्तर द्याहटवा
  2. अभिषेक,३०-३५ वर्षा पूर्वी इंजिनियरिंगचे विद्यार्थी नियमित मटका खेळायचे हे खरे वाटणार नाही,पण त्या मुळेच, त्यातील डी पी, एस पी, म्हणजे डबल पत्ती, सिंगल पत्ती,ओपन,क्लोज,संगम,तिकडम,ऑपोझिट,आकड्यावरचा लोड,घर,लंगडा म्हणजे सत्ता,छगन म्हणजे छक्का,मेंढी म्हणजे दस्सा ह्या शब्दांचा आम्हाला परिचय झाला.त्या विषयात,काही गणिती किंवा इतर काही फॉर्म्युले असतील हि किंवा नसतील हि पण कमकुवत मानसिकता,जुगारी मनात स्वाभाविक असणारी,चालणारी चलबिचल,भीती,हाव नि त्या मुळे त्या दिवशी ठेवलेल्या अपेक्षा ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून "टाकण्यात येणारा " त्या दिवसाचा आकडा ह्या गोष्टींचा सहभाग जसा मटक्या मध्ये असायचा तसाच नि तोच फॉर्म्युला थोड्याफार फरकाने,अगोदर जवळपास सर्व मालिका निर्माते नि नंतर त्या मुळे कथालेखक त्यांच्या मालिकां मध्ये वापरतात.इथे हरणे जिंकणे नसते,अथवा कमकुवत मनाचा हि संबंध नसतो,तर फरक फक्त "अपेक्षाभंगाचा"असतो आणि टी आर पी मुळे हे धक्का तंत्र नियमितपणे जेव्हा वापरणे अपरिहार्य होऊन बसते तेव्हा स्वाभाविकपणे,मालिके मधील नायक,नायिके पेक्षा खलनायक/नायिका सशक्त होतात,पण कथानक भरकटते.
    थोडक्यात काय ताल,सूर,ठेका चुकलेल्या गायकाला,पुन्हा समेवर येण्या साठी जी धडपड करावी लागते तशी ह्या मालिकांच्या लेखकांची नि निर्मात्यांची अवस्था होऊन बसते.

    उत्तर द्याहटवा
  3. कृपया "इंजिनियरिंगचे काही विद्यार्थी सुद्धा नियमित मटका खेळायचे" असे वाचावे.

    उत्तर द्याहटवा