भोज्जा

शनिवार, १७ मार्च, २०१८

संगीताचा गुलाम आणि गुलामचं संगीत

१९७३ च्या फिल्मफेयर अॅवाॅर्ड नाईट मध्ये स्टेजवर अचानक एक बाका प्रसंग उद्भवला.मनोजकुमारच्या ”बेईमान” या त्या वर्षीच्या ७ फिल्मफेयर अॅवाॅर्ड जिंकलेल्या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचं पारितोषिक "प्राण" या बुजुर्ग अभिनेत्याला  जाहीर झालं आणि प्राणने ते स्टेजवर जात स्वीकारायचं मात्र नाकारलं.

त्या मागचं कारण मात्र जेव्हां त्यानं सांगितलं तेव्हा उपस्थितांमधील  १०० पैकी १०० जणांची त्याला मनापासून मान्यता होती पण फक्त प्रायोजकांची त्याला मान्यता नव्हती.प्राणने त्या मागचे कारण देतांना त्या वर्षीचे संगीताचे फिल्मफेयर अॅवॉर्डचे खरे मानकरी त्याच्या मते पैगंबरवासी गुलाम मोहम्मद होते आणि ते सुद्धा त्यांच्या  निधनानंतर ४ वर्षांनी प्रदर्शित झालेल्या  “पाकीजा “ च्या  त्यांच्या ऑल टाईम ग्रेट म्युझिक साठी.

खरं तर प्राणचा आणि "पाकीजा" चा काडीचा संबंध नव्हता पण त्याने अभिनय केलेला व त्या वर्षीचा हिट सिनेमा असलेल्या “बेईमान”च्या शंकर जयकिशन च्या तद्दन सामान्य संगीता पेक्षा पाकीजाचे म्युझिक कैक पटीने उजवे होते यात शंकाच  नाही.आणि म्हणूनच प्राणने त्याचा विरोध करत  त्याचे ते तेव्हाचे पारितोषिक नाकारले.प्राणची ती कृती किती योग्य होती हे  आज २०१८ मधे म्हणजेच पाकीजाच्या ४२ वर्षा नंतर सुद्धा लक्षात येते कारण पाकीझाचे संगीत तरुण पिढीला आजही भावते नि बेईमान नावाचा एक ७ फिल्मफेयर अॅवाॅर्ड विनर सिनेमा येऊन गेला होता हे माहित देखील नाही यातच सगळे आले. तेव्हाच्या एच.एम.व्ही.ला म्हणजेच आत्ताच्या सारेगामाला १९९७ साली ते पाकीजा़चे म्युझिक पुनः प्रदर्शित करावे लागले यातच सगळे आले. 

या पाकीजाच्या वेळच्या घटना आठवायचं आज कारण म्हणजे त्याचे संगीतकार गुलाम मोहम्मद ज्यांचा आज १७ मार्च २०१८ हा बरोब्बर ५० वा स्मृतिदिन आहे. १९०३ मध्ये जन्मलेले गुलामजी हिंदी सिनेमात त्यांच्या उमेदीच्या काळात उत्कृष्ट तबलजी व ढोलक वादक म्हणून प्रसिद्ध होते.राजकपूरच्या गाजलेल्या बरसात मधील “बरसात में ताक धीं ना धीं " त्यांनीच वाजवलंय...उमेदीच्या काळात आपल्यापेक्षा १४-१५ वर्षांनी लहान असणाऱ्या नौशाद यांचा सहाय्यक म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरु केली आणि १९४८ ते १९५५ वर्षाला प्रत्येकी तीन या प्रमाणे चित्रपटांचे स्वतंत्र यशस्वी संगीत दिग्दर्शक अशी ८ वर्षे त्यांची प्रमुख कारकीर्द झाली. पण १९५५ नंतर व खास करून १९५७-५८ च्या पाकीजाच्या निर्मितीच्या सुरवातीच्या काळा नंतर त्यांच्या कारकीर्दीला जे ग्रहण लागले ते लागलेच.खरे तर कारण कोणतेच नाही पण गुलामजी त्यांत भरडून निघाले आणि पाकिजा अर्धवट असतांना १९६८ सालीच ते अल्लाला प्यारे झाले.पाकीजाचे नंतरचे त्यांचे राहिलेले थोडे संगीत नौशाद यांनी त्यांच्यावरील प्रेमाला जागून पुरे केले.

हा पाकिजा त्या काळी त्या सिनेमाशी संबंधित असणाऱ्या बऱ्याच जणांच्या आयुष्याशी खेळून गेला,धूळधाण उडवून गेला.मुळात पाकीजाची निर्मिती जवळपास पंधरा वर्षे सुरु होती.निर्माता दिग्दर्शक आणि सिनेमातील नायिका मीनाकुमारी हिचा खाजगी जीवनात  पती असलेला कमाल अमरोही हा म्हटलं तर तसा सणकीच होता.या सिनेमासाठी त्याने वारेमाप खर्च करून लावलेले लंबे चौडे सेट्स, चित्रपट पूर्ण होण्यास लागलेला वेळ ,मीनाचे दारूच्या आहारी जात तिच्या तब्येतीची उडालेली धूळधाण ,सिनेमाचा संगीतकार गुलाम मोहम्मद आणि त्याचे कॅमेरामन जोसेफ विरस्चींग यांचे निधन आणि सर्वात महत्वाचे  म्हणजे फायनान्सर लोकांचा अमरोही वरील पूर्ण उडालेला विश्वास या अशा वातावरणात १९७२च्या फेब्रुवारीत पाकीझा रिलीज झाला.

पाकीझाच्या निर्मितीच्या काळातले संगीत आणि तो पूर्ण होतानाचा आर .डी.बर्मनच्या काळातील बदललेले संगीत या मुळे चित्रपट संगीताची  व्याख्या पूर्णपणे बदलली होती.त्या मुळे पाकिजा रिलीज व्हायच्या अगोदर त्याचे संगीत जरी रेडीओ वर हिट होउन  वाजत होते तरी त्या काळी फक्त चित्रपटातील हिट संगीत चित्रपट चालायला पुरेसे नसायचे.त्या मुळे पाकीजाचे पडद्यावर स्वागत मात्र अतिशय थंड झाले.पहिल्या दोन चार आठवड्यात तर प्रचंड खर्चिक अशा ऑल टाईम सुपर फ्लॉप मध्ये त्याची नोंद होतच  होती  तेवढ्यात कथेत एक मोठा  ट्वीस्ट आला नि ३१ मार्च १९७२ ला म्हणजे चित्रपट रिलीज झाल्यावर त्याच्या दुसऱ्याच महिन्यात मीनाकुमारी गेली.झाले ... मीनाकुमारी प्रती प्रेक्षकांचा असणारा स्नेह ,आणि सहानुभूतीच्या लाटेने प्रेक्षक मीनाकुमारीची पाकीझातील तिची शेवटची अदाकारी बघायला सिनेमा थेटरात खेचले गेले आणि नंतर चित्रपटाने दैदिप्यमान यश संपादन केले.

पण वाईटात कां होईना एक बरे झाले कि, त्या मुळे १९४० ते १९७० च्या हिंदी सिनेमाच्या संगीताच्या सुवर्णयुगातील संगीतातील तारा पै.गुलाम मोहम्मद हे पाकीजाच्या रूपाने लोकांनी त्या काळी अनुभवले.

आजचे गुलामजींचे त्याच पाकीझा मधील प्रचंड गाजलेले गाणे या निमित्ताने 👇

मंगळवार, १३ मार्च, २०१८

नासिरभाई ! अल्लाह आपको सलामत रखे !

तुम्हांला मायकेल बेव्हन आठवतोय ? ...
बघा ! हा कोण होता ? इथपासून तुमची सुरवात झाली ... अहो ! हा आत्ता –आत्ता १२-१५ वर्षापूर्वी रिटायर झालेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ! विसरलात नां तुम्ही ?... अहो ! त्यां लोकांच्या क्रिकेट इतिहासात हा बऱ्यापैकी मोठा समजला जातो...कारण वन डे मध्ये पाचव्या सहाव्या किंवा वेळप्रसंगी सातव्या नंबरला येऊन सुद्धा यान त्यांच्या कित्येक गेलेल्या मॅचेस काढून दिल्या आहेत.... बघितलं नां ? आपली मेमरी आपल्याला कसा धोका देते ते ?... असंच होत आपलं ... त्यात नवीन काही नाही...

हे आज सांगायचं कारण म्हणजे आज १३ मार्चला आज पासून १६ वर्षापूर्वी गेलेल्या नासीर हुसेनच देखील तेच झालंय  ...नासीरच  वैशिष्ट्य म्हणाल तर आयुष्यभर लोकांना त्याचे यशाचे सिक्रेट समजून देखील ....म्हणजेच ...एकाच कथेवर त्याच-त्याच पठडीतले तेच-तेच नियमित सिनेमे काढत राहून देखील , लोकांच्या डोक्याला बिलकुल ताप न देता त्यानं अतिशय उत्तमोत्तम संगीताचे सिनेमे दिले आणि ते प्रचंड चालले सुद्धा ..... लोकं त्याचे  हे सर्व सिक्रेट जाणून होते तरी त्याच्या प्रत्येक सिनेमाला ते  हुं म्हणून गर्दी करायचे,जणू प्रत्येकवेळी आपण काही तरी नवीन पहातोय या भावनेने , पण एवढं असून देखील   त्याचा संगीताचा कान आणि सेन्स किंवा  सिनेमा या माध्यमा वरची   पकड ही इक्विवॅलेंट टू राजकपूर होती  असं त्याला त्याच्या उभ्या हयातीत कधी कुणी म्हणल नाही... हे त्याला तेव्हा कुणी म्हणल नाही तर  त्या मुळे तो गेल्यावर तर त्याला कोण लक्षात ठेवणार ?...

पण नाही ! त्याला आम्ही लक्षात ठेवलंय महाराजा ! कारण त्याच्या वरच्या  नि त्या वेळच्या  अशाच काही जणांच्या वरच्या केवळ निस्सीम प्रेमापोटी त्यांचे  सिनेमे कॉलेजेस् बंक करून बघयला मिळावेत या साठी आम्ही आमच्या कॉलेजची तेव्हाची ३ वर्षाची शिक्षण ५-५ वर्ष लांबवली आहेत.आज तुम्हांला हा थोडा आगावू पणा वाटेल पण या रूपाने आमच्या पिढीने जणू या लोकांना त्यांच्या जिवंतपणीच श्रद्धांजली वाहिली आहे.  

त्या मुळेच आज त्या नसीर हुसेनची आठवण त्याच्या सोळाव्या स्मृतीदिनी पुन्हा एकदा त्याच्या १९७६च्या   एका गाजलेल्या सिनेमातील एव्हर ग्रीन गाण्यातून करून देताना एक वेगळा आनंद होत  आहे. 

बाय द वे , हे गाणं बघतांना मला एक सहजच  कवी कल्पना सुचली ती ही सांगून टाकतो कारण हे गाणे नीतू सिंगवर गेस्ट अार्टिस्ट म्हणून चित्रित झालंय जी आज २०१८ मधे सुद्धा अतिशय सरळ साधी नि निरागस दिसते आणि आहे ... पण पुढे-मागे त्या रणबीर कपूरचे लग्न झाल्यावर,त्याची बायको म्हणजेच नीतूसिंग ची सून  आणि नितूचे न जाणो  काही एक कारणाने जर कधी काळी त्यांच्या घरातल्या-घरात वाजले तर नितू तिला तिचं हे गाणं दाखवून क्षणात चूप करू शकेल नि म्हणेल “बाई ,तुला मी काय होते ते माहित नाही ! आली मोठी शहाणी...! लागली  मला अक्कल शिकवायला !!!!! आधी हे बघ ! म्हणजे तुला कळेल मी काय चीज होते ते !!!! .... माझ्या पुढे फार हुशारी करू नकोस 😜

असो...बास ... आता गाणं बघा !
👇👍