भोज्जा

शनिवार, ३० डिसेंबर, २०१७

गोपाल शर्मा ,३० डिसेंबर ,जन्मदिवस

आवाज कि दुनियाके दोस्तोंको गोपाल शर्मा का नमस्कार  !

१९५६ ते १९६७ या कालावधीत रेडीओ सिलोन वरून या पद्धतीची अनाउन्समेंट ऐकणारे आणि रेडिओला चिकटून बसणारे  माझ्या सारखेच असंख्य लोक आज सुद्धा हयात आहेत. तो लोकप्रिय आवाज म्हणजेच श्री. गोपाल शर्मां यांचा  आज ३० डिसेंबर हा ८६वा वाढदिवस... त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि शतायुषी भव हि सदिच्छा.

भाषेवरील उत्कृष्ठ पकड,ओघवती शैली आणि आणि भारतीय चित्रपट संगीताचा अभ्यास या सोबत अतिशय गोड आवाज हे गोपालजी यांच्या निवेदनाचे वैशिष्ट्य होते. संगीत दिग्दर्शकात शंकर-जयकिशन हा गोपालजी यांचा प्रचंड वीक पॉइंट होता.

त्या काळी स्वतः शंकर-जयकिशन त्यांचे चाहते होते. गोपालजींच्या चित्रपट संगीताच्या अभ्यासाचे खुद्द राजकपूर यांना हि खूप नवल वाटायचे...सगळ्या चित्रपट सृष्टीत तेव्हा गोपालजी फेमस होते. त्याचा एक किस्सा गोपालजी यांनी मागे सांगितला होता. 

१९६१चा दिलीपकुमारचा गंगा-जमुना येण्या अगोदरच त्यातील गाणी हिट झाली होती. त्या सुमारासच योगायोगाने दिलीपकुमार कोलंबो मध्ये आले होते ... संधी साधून गोपालजी त्यांना भेटले व त्यांना  रेडिओ सिलोनवर येण्याचे त्यांनी आमंत्रण दिले व त्याचा सत्कार समारंभ आयोजित केला.    
दिलीपकुमार यांनी प्रथम नको-नको म्हणत ते नाकारले पण गोपालजींच्या आग्रहामुळे शेवटी ठीक आहे मी येतो असे त्यांनी कबुल केले.साहेब नक्की या बरं का ? तुम्ही नाही आलात तर मी गंगा जमुनाची गाणी माझ्या कार्यक्रमात वाजवणार नाही असे हि त्यांनी सांगितले.दिलीपकुमार सारखी मोठी व्यक्ती रेडीओ सिलोनवर येतेय म्हणल्यावर साधारण १५ हजार लोकांची त्या कार्यक्रमात सोय होईल अशी रेडीओ सिलोनने व्यवस्था देखील केली....पण दिलीपकुमार आलेच नाही.गोपालजी पण इतके खमके कि त्यांनी दिलीपकुमार यांना सांगितल्या प्रमाणे तेव्हा गंगा जमुनाची गाणी त्या वेळच्या कार्यक्रमात नाही ते नाही वाजवली ... ठकास महाठक ...

अशा या ज्येष्ठ्य निवेदकास या निमित्ताने मानाचा मुजरा .. शतायुषी भव हि सदिच्छा ...

त्यांच्या २०१३ सालच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ व आठवणी या निमित्ताने आज पहा.↓ 

     

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

राजेश खन्ना : जन्म २९ डिसेंबर १९४२.

गोष्ट आहे १९७८-७९ मधली.बासू चटर्जी अवघ्या ३-५ लाखात सिनेमा बनवतो हे माहिती झाल्यावर सेक्रेटरीला पुढ्यात घालून त्याला निर्माता व्हायचंय असं सांगत जितेंद्र ,धर्मेंद्र ,राजेश खन्ना यांनी पडद्या मागचे निर्माते बनत १९७६ ते १९८० मध्ये स्वतः हिरो बनत अनुक्रमे प्रियतमा,दिल्लगी आणि रेड रोझ हे सिनेमे बनविले व पैसे पण मिळवले.

त्यातील आजचा मानकरी राजेश खन्ना . कारण त्याचा नि त्याच्या मुलीचा ट्विंकलचा आज २९ डिसेंबर हा जन्मदिवस.

रजनीगंधा ,छोटीसी बात ,चितचोर याचे यश बघत एकदिवस राजेशने सुद्धा बासूला फोन करून आपल्याला पिक्चर करायचंय सांगत भेटायला बोलावले... बर भेटायचं तर तेव्हा राजेश प्रचंड बिझी. त्यातून बारा पिंपळावरचा मुंजा... भेटता भेटेना...शेवटी राजेशलाच एक दिवस ऑकवर्ड झालं नि त्यान बासूला कुठल्याश्या रेकॉर्डिंग स्टुडीओत बोलावले.

बासू गेला तर याचं ,डबिंग चाललं होतं ... शेजारी व्हिस्कीचा ग्लास नि साहेब समोर पडद्यावर सीन पाहून संवाद म्हणत होते... डबिंग झाल्यावर राजेशने थेट मुद्द्याला हात घालत बासूला सांगितले, एखादी स्टोरी बघ.. तुला कोण-कोण , कसं-कसं लागतंय ते तुझ तूच बघ नि सिनेमा सुरु कर. पैशाची काळजी करू नको....

हि मंडळी अशीच होती.. हाडाचे कलाकार.. एक नंबर सनकी ...

बासूने “रेड रोझचे” कथानक फायनल केले नि राजेशला विचारले कि कसं वाटतंय कथानक... राजेश म्हणला “माझ्या साठी हे योग्य आहे असं तुला वाटतंय ना ? मग बास ..
हिरो म्हणून राजेश फायनलच होता पण नायिका म्हणून कुणाला घ्यायचं ? असं नंतर बासूने त्याला विचारल्यावर राजेश म्हणला तूच सांग... कुणाला आणू ?... तू कुणीपण सांग ,ती काम करणार ...
पूनम धिल्लनकडे तारखा होत्या म्हणून मग तिला निवडली..

हा चित्रपट करताना बासूला राजेशचा एक वेगळाच पैलू समजला.म्हणजे गम्मत बघा ... निर्माता राजेश ,नायक राजेश,पैसा अडका सगळा राजेशचा पण हा बाबा इतका मनस्वी होता कि हा स्वतःच्या सिनेमासाठी बासूला तारखाच द्यायचा नाही... कारण तो त्या काळी टॉपचा हिरो होता व बाहेरच्या सिनेमात प्रचंड बिझी असायचा... त्या मुळे व्हायचं उलट कि त्याचं नुकसान होऊ नये,सिनेमा वेळेत पूर्ण व्हावा या साठी बासू चटर्जीला त्याची मनधरणी करावी लागायची... नि दादा-बाबा करत त्याला  सेटवर आणावे लागायचे... बर पैशाच म्हणालं तर बासूने नुसता आवाज टाकायचा .. सेक्रेटरी पुडकं घेऊन हजर व्हायचा .. बिलकुल कुरकुर नाही कि आधीचे हिशेब दाखवा हि भानगड नाही... बासू सोबत त्याचा हा पहिलाच सिनेमा असूनही राजेशचा याच्यावर पूर्ण विश्वास... पण त्या मुळे व्हायचं उलट .. कशात काही नसतांना बासूला याचं प्रचंड प्रेशर यायचं... तो ते राजेश पाशी बोलून पण दाखवायचा .. त्यावर उलट राजेशच ,बासूला सांगायचा “दादा टेन्शन मत लो... पिक्चर चली , नही चली तो भी चिंता मत करो...
तर असा हा अफलातून राजेश खन्ना ... हिंदी सिनेमातला  एकमेव सुपरस्टार ...

या सिनेमाच्या वेळचेच दोन किस्से सांगतो नि मग थांबतो...

रेड रोझ च्या वेळी एकदा बासूने लोणावळ्याला आऊट डोअर शुटींग ठेवलं होत.. नायिकेसकट सगळे वेळेत आले पण हा बाबा येतो येतो म्हणत दुपारच्या १ वाजे पर्यंत आलाच नाही... राजेशचा सेक्रेटरी ऊर्फ या सिनेमाच्या डमी निर्मात्याने लंचब्रेक डिक्लेयर केला .. सगळ  युनिट व्यवस्थित जेवलं नि नंतर त्या सेक्रेटरीने आज साहेब काही येत नाहीयेत त्या मुळे pac अप करूयात ... असं सांगितलं ..

बासू सेक्रेटरीवर वैतागला नि म्हणाला कि, राजेश येत नाहीये हे तुला आधीच माहित होत, तर तू मघाशीच का म्हणून नाही सांगितलं ?.. त्या वर त्या सेक्रेटरीने बासूला सांगितले कि साहेबांना आज जमणारच नव्हते पण आपले शेड्यूल आधी लागले होते नि लंच ब्रेकच्या अगोदर जर pacअप केले असते तर युनिटचा विनाकारण हाफ डे लागला असता आणि जेवायची व्यवस्था जी आधीच केली होती ते जेवण आणि अन्न सुद्धा वाया गेले असते त्या मुळे साहेबांनीच मला हे असे या पद्धतीने कर म्हणून सांगितले होते... ते मी फक्त केले...... आहे कि नाही ? याला म्हणतात १०० नंबरी सुपरस्टार ..

याचं सिनेमात एका सिक्वेन्स मध्ये राजेश सकाळी दूधवाल्या भैय्याच्या वेशात नायिकेकडे येतो असा एक शॉट आहे.. हा सीन तीन वेळा कॅन्सल करावा लागला ..  कारण सकाळी सूर्य उगवतोय आणि  सिनेमाचा नायक ऊर्फ राजेश हा सायकलवर येतोय असा प्रसंग होता ... पण सलग तीन दिवस झालं काय कि, साहेब , सेटवर उगवायचेच मुळात ११ – १२ नंतर .. मग त्या नंतर कसलं डोम्बलाच शूट करणार.. शेवटी बासूने कंटाळून चवथ्या दिवशी भर बाराच्या उन्हात हा शॉट घेतला ... आज सुद्धा तुम्हांला तो सिनेमात बघयला मिळेल ... विशेष म्हणजे या चित्रपटाचा सर्वेसर्वा असूनही प्रत्येकवेळी होणाऱ्या उशिरा बद्दल बासू कडे येतांना ,राजेश अपराध्या सारखं ,कसनुस तोंड करत ,दाता खाली जीभ दाबत माफी मागायचा .. व दादा प्लीज गुस्सा मत होवो ! असं म्हणयचा ...  

असा हा अफलातून मनस्वी कलाकार आज जर हयात असता तर आज त्याची पंचाहत्तरी साजरी झाली असती.. वुई विल मिस यू राजेश ...

(आजच्या लेखना साठी संदर्भ अनिता पाध्ये यांचे “यही है जिंदगी” या मधून घेतला आहे.)

धन्यवाद अनिताजी ...  


बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

गुरूची विद्या गुरूला

प्रसंग १९७३ चा आहे.तामीळनाडू दौर्यावर पंतप्रधान इंदिरा गांधी  शंकराचार्यांच्या कांची मठात गेल्या.

मठातील सर्वांनी स्वागत करून त्यांना शंकराचार्यां कडे नेले.

 १ तासभर इंदिराजी व शंकराचार्य एकमेकां समोर बसले , पण दोघे ही एकमेकांशी एकही शब्द बोलले नाहीत.

तासाभराने इंदिराजींकडे पहात छोटेसे स्मितहास्य करून शंकराचार्य आतमधे निघून गेले.

निराश होत इंदिराजी तेथून निघून गेल्या. दुसर्या दिवशी  वर्तमानपत्रात ही बातमी हेडलाईन होती.

नंतर पत्रकारांनी शंकराचार्यांना विचारले कि स्त्रीपंतप्रधान असल्याने तुम्ही इंदिराजींशी असे वागलांत कां ?  पंतप्रधान म्हणून इंदिराजी त्यांना आवडत नाहीत कां ?

मात्र यावर शंकराचार्यांनी पत्रकारांना जे सांगीतले ते ऐकून सगळे चकित झाले.

शंकराचार्य म्हणाले,  मागे मी हिंदू  धर्मादाय निधी खाते ( HR & CE Department ) या मिनिस्ट्रीला  संबोधून पंतप्रधान कार्यालयाशी , हिंदू देवळांशी संबंधित असलेल्या अडचणीं विषयी जेव्हा पत्रव्यवहार केला , तेव्हा पंतप्रधानांना या विषयासंबंधित चर्चेस मला वेळ नसल्याचे कळविले.

त्या काल येथे आल्यावर , मठाधिपती म्हणून मला त्यांच्याशी हा विषय वगळता त्यांच्या खाजगी किंवा राजकीय आयुष्या विषयी बोलण्यांत कुठलेच स्वारस्य नव्हते आणि हिंदू धर्म धर्मादाय निधी ,हिंदू देवळांच्या अडचणीं या विषयाची चर्चा करण्यांस त्यांना वेळ नाही...मग अशा वेळी मी काय करणे अपेक्षित होते असे तुम्हांला वाटते ?

तात्पर्य : डॉक्टर्स नेहमी पेशंटचा रोग पाहून उपचाराची दिशा ठरवतात....😜🙈😉



विजय अरोरा ,स्मृतिदिन, २७ डिसेंबर

काही लोकांच्या विषयी पुरेशी माहिती करून न  घेता आपण त्यांच्या परस्पर त्यांच्या विषयी स्वतःची मते बनवतो आणि तीच योग्य आहेत अशी समजूत करून घेऊन ती दुसऱ्यांच्या समोर मांडतो , हा मनुष्य स्वभाव आहे.... या पद्धतीने ते तसे मत मांडणे ,त्याच्यावर आरोप करणे किंवा त्याच्या विषयी कागाळ्या करणे याला मराठीत हेत्वारोप असे नाव आहे.(हा शब्दप्रयोग मराठी भाषेतून हळूहळू लुप्त होत चालल्याने हे एवढे विश्लेषण)

हे इतके सविस्तर सांगायचे कारण म्हणजे आज अशा दोन व्यक्तींचा जन्मदिवस आहे ज्यातील पहिली व्यक्ती ही  कायमच वादग्रस्त राहिली आहे आणि दुसरी व्यक्ती विनाकारणच तिच्या आयुष्यात फ्लॉप अभिनेता किवा अयशस्वी व्यक्तिमत्व होते असा बऱ्याच जणांचा समज आहे. तर त्या दोन व्यक्ती म्हणजे पहिली सलमान खान आणि दुसरी  विजय अरोरा.  

आज २७ डिसेंबर ,सलमान खान आणि विजय अरोराचा आज जन्म दिवस..

सलमान बद्दल आज बरंच तुम्हांला वाचायला मिळणार कारण त्याचं नाणं अजून चलनात आहे.त्या मुळे मी त्याच्या विषयी आज काहीच बोलणार नाहीये ... पण विजय अरोरा आज स्मृतीच्या पडद्याआड झालाय ..(१९४४-२००७) त्या मुळे आज फक्त त्यालाच उजाळा.

विजय अरोराचा  जन्म १९४४ चा.गांधीनगर ,गुजरातचा ... सुमारे ११० सिनेमे आणि ५०० हून अधिक टीव्ही सिरीयल्सचे भाग अभिनेता म्हणून यशस्वीरित्या केल्यानंतर याने स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरु करत अनेक जाहिराती तयार केल्या. या क्षेत्रातील भारतातील पहिली आय एस ओ ९००० कंपनी असण्याचा मान याच्या कंपनीने मिळवला आहे. त्याने जेम एन्ड ज्वेलरी कौन्सिल इंडिया या संस्थेचे असंख्य कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन तर केलेच पण त्या सोबत असंख्य कंपन्याची प्लेईंग कार्ड्स बनवत ती अमेरिकेतील वार्नर ब्रदर्स कंपनीच्या सुपर man चित्रपटासाठी उपलब्ध करून दिली .    

२००७ साली पोटाच्या किरकोळ दुखण्याने दवाखान्यात दाखल झालेला हा अभिनेता अचानक लिव्हर कॅन्सर च्या शेवटच्या स्टेज मध्ये असल्याचे डॉक्टरी निदान झाले नि हा तडकाफडकी ६३ व्या वर्षीच हे जग सोडून गेला.... विशेष म्हणजे हा पुण्यातील फिल्म इन्स्टीट्यूट चा १९७१ चा अभिनयाचा गोल्ड मेडलीस्ट या नात्याने  तरुण पिढीला मुंबईमध्ये अभिनय,योगासने आणि शारिरीक तंदुरुस्तीचे पाठ द्यायचा ... याचा मुलगा फरहाद हा सुद्धा  फेरारी,मसेराटी या इम्पोर्टेड रेसिंग गाड्यांचा भारतातील प्रमोटर आहे.

थोडक्यात काय तर बेभरवशाच्या चित्रपट व्यवसायात राहून सुद्धा याचे अवघे ६३ वर्षाचे याचे निष्कलंक  आयुष्य हे  अत्यंत यशस्वी होते, यात तिळमात्र शंका नाही.

तात्पर्य : फक्त जे चकाकते तेवढेच फक्त सोने नसते , तर सोन्याची पारख करायला प्रथम आपण स्वतः जातिवंत सोनार असण महत्वाच असतं.   


विजय अरोराचे आजचे गाजलेले गाणे यादोंकी बारात या सिनेमातील...झीनत अमान सोबतचे ,रफी –आशा या कॉम्बिनेशन चा सुंदर नमुना म्हणून रसिकांनी मान्य केलेले ...  ↓ 






सोमवार, २५ डिसेंबर, २०१७

जी पी.सिप्पी २५ डिसेंबर स्मृतिदिन

आज २५ डिसेंबर .. आणि खरे तर अटलबिहारी वाजपेई ,संगीतकार नौशाद यांचा जन्मदिवस किंवा चार्ली चाप्लीनचा स्मृतिदिन  पण .... मराठी माणसाने व्यवसायात काही शिकावे,बोध घ्यावा,आदर्श ठेवावा अशा व्यक्तिमत्वाची म्हणजेच जी.पी.सिप्पींची ओळख माझ्या अंदाजाने मराठी वाचकांना प्रथमच कुणी करून देत आहे....

मराठी माणसाने धंदा शिकावा तर तो सिंधी माणसाकडून. कारण काळाची गरज ओळखून, करत असलेल्या धंद्यातून योग्य नफा काढून घेत सर्वांगीण प्रगती करणे म्हणजे काय ते या लोकांच्या कडून शिकावे.  
आजचा दिवस त्या मुळेच  एका आदरणीय, काळाच्या सोबत किंबहुना काळाच्या खूप पुढे रहात सर्वांगीण प्रगती साधत भारतीय चित्रपट इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरणाऱ्या गोपालदास परमानंद ऊर्फ जी.पी.सिप्पी यांच्या स्मृती प्रित्यर्थ  समर्पित.

१९१४ साली सध्याच्या पाकिस्तानातील हैद्राबाद मध्ये त्यांचा जन्म झाला.स्वातंत्र्यासाठी गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहात ६ महिने तुरुंगवास भोगलेला माझ्या माहितीतील हिंदी सिनेमातील हा एकमेव स्वातंत्र्य सैनिक आहे.    
फाळणीमुळे १९४७ साली म्हणजेच त्यांच्या वयाच्या ३३-३४ व्या वर्षी सर्व घरदार,जम बसलेला त्यांचा कराची,पाकिस्तानातील  कार्पेट विक्रीचा व हॉटेलिंगचा धंदा नाईलाजास्तव सोडून, मुंबईला येत त्यांनी वकिली सुरु केली.

१९४७ साली स्वातंत्र्योत्तर भारत सरकारचा नवीन मालकी तत्वावरील ओनरशिप बांधकाम कायदा अमलात आला आणि  त्यांना काळाची गरज लक्षात आली.मग  त्यांनी वकिली सोडून बांधकाम व्यवसायात उडी घेऊन  कुलाब्यात सिंध चेम्बर्स ही ओनरशिप तत्वावरील मुंबईतील पहिली बिल्डींग उभी केली.
पण या व्यवसायास त्या काळात बिलकुल भविष्य नव्हते कारण लोकांच्या कडे पैसाच नव्हता... आत्ता सारखे वलय तर बिलकुल नाही.... मग  काय करणार ? सिप्पींच्या ही गोष्ट त्वरित लक्षात आली व त्यांनी १९५२ साली काळाची गरज लक्षात घेत , चित्रपट निर्माता म्हणून हिंदी चित्रपट व्यवसायात येत त्याचे हि तंत्र आणि गणित लगेच समजून घेतले आणि  या नवीन व्यवसायात निर्माता व दिग्दर्शक या नात्याने घोडदौड सुरु केली.

१९७४ पर्यंत ते या व्यवसायात खूपच नावाजलेले व स्थिरावलेले व्यक्तिमत्व झाले.त्यांनी निर्माता म्हणून असंख्य हिट सिनेमे दिले व तुफान पैसा कमावला ...  

१९७३ च्या सीता और गीताच्या तुफान यशा नंतर मुलगा रमेश सिप्पीने त्यांच्या कडे शोलेच्या निर्मिती साठी १ करोड रुपये मागितले. विशेष म्हणजे सीता और गीताच्या निर्मिती साठी सिप्पींना तेव्हा सगळा मिळून  ४० लाख रुपये खर्च आला होता...पण सिप्पींनी शोलेची स्टारकास्ट, कथानक व स्वरूप लक्षात घेऊन मुलाला ३ कोटीचे बजेट मंजूर केले.... बाप असावा तर असा...   पुढचा इतिहास सांगण्यात हशील नाही कारण मुंबईतील मिनर्व्हा थेटरात सलग २८६ आठवडे मुक्काम ठोकत शोलेने इतिहासात रचला.

सध्याच्या काळात आपण १५०  कोटी रुपये बजेट असलेले चित्रपट पहातो ज्यात १५० कोटीं पैकी १०० कोटी नायक नायिकेचा मोबदला असतो व उरलेल्या ५० कोटीत सिनेमा बनलेला असतो.शोलेचे वैशिष्ट्य असे कि त्याची स्टारकास्ट डोळ्यापुढे आणा कारण  त्याच्या ३ कोटीं निर्मिती मूल्यातील  फक्त २० लाख रुपये हा चित्रपटात काम केलेल्या सर्व अभिनेत्यांचा मोबदला स्वरुपातला खर्च होता. म्हणून शोले सारखा सिनेमा हा इतिहासात एकदाच बनू शकतो.

शोलेच्या उत्तुंग यशा नंतर व वयाची साठी पार केल्यावर खरेतर एखादा माणूस गप्प पडला असता ... पण गप बसतील  ते सिप्पी कुठले ? १९८७ साली म्हणजे त्यांच्या वयाच्या ७३ व्या वर्षी दूरदर्शन वरील भारत-पाकिस्तान फाळणी या विषयाला वाहिलेली पहिली  प्रदीर्घ मालिका “बुनियाद” ची निर्मिती करून त्यांनी भावी पिढीला फाळणीच्या दुःखाची प्रथमच ओळख करून दिली. ही  मालिका त्या काळी प्रचंड लोकप्रिय व यशस्वी झाली होती.टीव्ही वरील “मालिका” हा आजच्या काळात सुद्धा लोकप्रिय असलेल्या ट्रेन्डचे जनक जी.पी.सिप्पी आहेत हे आजच्या पिढीला काय जवळपास कुणालाच माहित नाही.

निर्माता म्हणून वयाच्या ८४ व्या वर्षी (१९९८ साली )आपला शेवटचा हिंदी सिनेमा काढून त्यांनी सिनेसृष्टीतून निवृत्ती घेतली.अगदी आजच्या काळात सुद्धा हिंदी सिनेमात कित्येकजण असे आहेत ज्यांची ओळख आपल्याला जी पी सिप्पींच्या मुळे झालीये ... मग तो शाहरुख असो कि,अजून कोणी असो....


असे हे अलौकिक व्यावसायिक व्यक्तिमत्व आपल्यातून वयाच्या ९३ व्या वर्षी २००७ साली आपल्यातून निघून गेले ... त्यांना आजच्या या स्मृतीदिनी  मानाचा मुजरा...   🎥

शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

यात आपण नक्की कुठे ?

जेव्हा-जेव्हा तुम्ही सजगपणे  इतिहासा कडे बघता तेव्हा- तेव्हा   असे लक्षात येते कि,जेव्हा कोणत्याही देशातील तमाम जनता त्यांची जात,पात,देव,धर्म ,उदबत्या ,पणत्या,धूप, निरांजन , मेणबत्या हे फक्त आपापल्या श्रद्धा स्थाना पुरते आणि स्वतः पुरतेच जेव्हा मर्यादित ठेवतात आणि  देशाच्या सर्वांगीण विकासासाठी  " तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार " हि उक्ती विज्ञानाची कास धरत जेव्हा पूर्णपणे अंगी बाणवतात तेव्हांच त्या-त्या देशांचा विकास शक्य झाला आहे.

जेव्हा गॅलिलिओने (इ.स. १५६४-१६४२) " पृथ्वी हि स्वतः भोवती फिरत सूर्या भोवती फिरते व चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे " हे जगाला सूर्यमालेच्या रूपात ज्ञात करून दिले आणि ख्रिश्चन धर्मियांनी ती वास्तवात  निदान त्याच्या मृत्यूपश्चात कां होईना पण स्वीकारत स्वतःच्या विचारसरणीत जेव्हा बदल केला तेव्हा आणि फक्त तेव्हाच  यूरोप आणि नंतर अमेरिकेत खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात झाली.साधारण साडेसोळाव्या शतकापर्यंत जगातील जवळपास सर्वच देश हे देव-धर्म, आणि त्यांचे-त्यांचे धर्मग्रंथ केवळ यातच अडकलेले होते.विज्ञानाची कास धरे पर्यंत   ख्रिस्तपूर्व ४०० वर्षे जुन्या ऍरिस्टोटल या ग्रीक तत्ववेत्याचे तत्वज्ञान हा युरोपियन समाजाचा जणू धर्मग्रंथ होता.भगवान येशू ख्रिस्त यांचे पर्यंत आणि  नंतर बायबलमध्ये वेळोवेळी त्या-त्या काळातील देवासमान विचारवंतांनी त्यात लेखन करत, कालानुरूप स्वीकारयोग्य बदल केले.जे जगासाठी नंतर भविष्यात वरदान ठरले.